Maharashtra Cabinet Expansion :  अजितदादांचा आजार राजकीय असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झालीय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटप न झाल्यानं अजित पवारांचा आजार बळावल्याची चर्चा होती. महायुतीतला हा तिढा सुटल्याची माहिती समोर आल्यानंतर अजितदादा खडखडीत बरे झाले आणि त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागही घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आजारपण चर्चेचा विषय ठरला होता. अधिवेशन सुरु असताना अजित पवार दोन दिवस कुणालाही भेटले नाही. राज्यपालाच्या चहापानालाही अजित पवारांनी दांडी मारली. महायुती सरकारचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारही झाला तरी अजूनही कोणत्याच मंत्र्याला खातं मिळालं नाही. त्यामुळं मंत्रिमंडळात तब्बल 41 जण बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यातच अजित पवारांना अर्थखातं मिळणार नाही अशी कुणकुण लागली होती. या माहितीमुळंच अजितदादांचा आजार बळावल्याची चर्चा सुरु झाली. मंगळवारी रात्री खातेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली. 


झी 24 तासला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे गृहखाते, महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा आणि पर्यटन खाते जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडं नगरविकास खाते उद्योग शिक्षण आरोग्य गृहनिर्माण खाते राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादीकडे अर्थ खाते उत्पादन शुल्क खाते कृषी महिला व बालविकास खाते आणि मदत पुनर्वसन खातं राहणार असल्याचं सांगण्यात येतंय.


खातेवाटप अधिकृतरित्या जाहीर झालं नसलं तरी अजित पवारांच्या तब्येतील लगेचच सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी तातडीनं भेटीगाठींना सुरुवात केली. शिवाय ते विधिमंडळाच्या कामकाजातही सहभागी झाले होते. खातेवाटपामुळं अजितदादांना आजारपण झाल्याची चर्चा बिनबुडाची असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय. तांत्रिक कारणांमुळं खातेवाटप रखडल्याचंही ते म्हणालेत.


मंत्रिमंडळ विस्तारानंतर दोन दिवसांनंतर खातेवाटप होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. पण दोन दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही खातेवाटप झालेलं नाही. मनासारखं खातं मिळालं नाही तर अजितदादा पुन्हा आजारी पडणार अशी कुजबूज सुरु झालीय.