राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी | अखेर मुहूर्त ठरला! या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला? या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार 21 ते 22 दरम्यान होणार होता. मात्र मुहूर्त काही मिळेना आणि तिढा काही सुटेना असं होत होता. अखेर यासगळ्याला मुहूर्त मिळाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील फेऱ्याही वाढल्याचं दिसत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार २६ ते २८ जुलै दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळातील महत्त्वाचं असलेलं गृह खातं फडणवीसांकडेच राहणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन तब्बल तीन आठवडे उलटले तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार खोळंबला आहे.
का रखडतोय मंत्रिमंडळ विस्तार?
23 जुलैला भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. तर २४ जुलैला अमित शाहांबरोबर सगळ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे. 25 जुलैला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत असणार आहेत. या सगळ्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार 26 ते 28 जुलै दरम्यान होण्याची शक्यता आहे.