मंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, `कोण...`
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एकूण 39 मंत्र्यांनी रविवारी हिवाळी अधिवेशनाच्या आधी नागपूरमधील राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसहीत भाजपाचे 20 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत त्यांच्या पक्षाचे 12 आमदार मंत्रिमंडळात असून उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत त्यांच्या पक्षाचे एकूण 10 आमदार मंत्री झाले आहेत. एकूण 42 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं असलं तरी अनेक प्रस्थापितांना या मंत्रिमंडळामधून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. याबद्दल रविवारी रात्रीपासूनच नाशिकपासून ते राज्यातील अनेक भागांमध्ये ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी अगदी रस्त्यावर उतरुन नाराजी व्यक्त केली आहे. असं असतानाच आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जाताना भुजबळ हे पत्रकारांवर चिडल्याचं दिसून आलं आहे.
चिडून भुजबळांनीच विचारला प्रतीप्रश्न
नागपूरमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून विधानसभेत जाण्यासाठी छगन भुजबळ बाहेर पडले असता पत्रकारांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. यावेळेस त्यांना तुम्ही नाराज असल्याचं समजतंय असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. मात्र बराच वेळ पत्रकार त्यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर अखेर भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना, "होय, मी नाराज," असं अशी तीन शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली. पुढे त्यांना, 'नाराजी दूर केली जाईल असं वाटतं का?' असा प्रश्न विचारला असता भुजबळांनी, 'माहिती नाही मला,' असं उत्तर दिलं. पुढे पत्रकारांनी काही अपेक्षा आहेत का तुमच्या? असं विचारलं असता भुजबळांनी, "काही अपेक्षा नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. याचबरोबर भुजबळांना पत्रकाराने, "वरिष्ठांशी बोलणं झालं का?" असा प्रश्न विचारला असता भुजबळ चिडले. त्यांनी चिडूनच, 'कोण वरिष्ठ?' असा प्रतीप्रश्न पत्रकारांना केला आणि ते कारमध्ये जाऊन बसले.
हॉटेलमधून निघतानाही भुजबळांची चिडचीड
रेडिसन ब्लू हॉटेलमधून भुजबळ बाहेर पडल्यानंतर त्यांच्याभोवती पत्रकारांनी गर्दी केली असता ते मोठ्या आवाजामध्ये, "राष्ट्रगीताला हजर राहतो आणि मग बोलतो जा," असं म्हणाले. त्यानंतरही पत्रकारांनी त्यांच्या तोंडासमोर आपल्या चॅनेलचे बूम आणल्याने भुजबळ अधिक संतापत थोड्या चिडक्या स्वरातच, 'राष्ट्रगीत आहे आता राष्ट्रगीत,' असं म्हणाले आणि तिथून निघून जात होते. त्यावेळेस पत्रकारांचा गराडा त्यांच्याभोवती कायम असल्याचं पाहून त्यांनी, 'अरे राष्ट्रगीत आहे. माझं ते चुकेल. मला राष्ट्रगीताला जायचं आहे,' असं म्हटलं आणि ते निघून गेले. बराच वेळ भुजबळ आपली गाडी कुठे आहे हे शोधत होते.
नक्की वाचा >> '...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल
भुजबळांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी 'या' व्यक्तीवर
अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रमोद हिंदुराव यांनी भुजबळांची भेट घेतली असून पक्षाच्यावतीने ते भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.