Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी खातेवाटप झालं नसल्याच्या मुद्द्यावरुन, 'हे बिनखात्याचं सरकार आहे," असा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीसंदर्भात असलेल्या झिरो टॉलरन्सवरुनही राऊतांनी टोला लगावला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी, "मुख्यमंत्री यांच्याकडे कोणती खाती आहेत हे सांगू शकत नाहीत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे का? हे त्यांनाच माहीत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तर सगळी बोंब आहे," असा खोचक टोला लगावला. "40 जणांनी काल शपथ घेतली. अधिवेशन सुरू आहे. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची याची माहिती नाही की सगळी उत्तरं फडणवीस देणार आहेत?" असा सवालही राऊत यांनी खातेवाटप न झाल्यावरुन विचारला आहे. "रवी राणा यांचं देखील मंत्रिपदासाठी नाव ऐकलं. ते देखील अमरावतीला गेले. जे आमच्याकडून गेले ते सत्ता, पद आणि पैशासाठी गेले हे स्पष्ट झालं," असंही राऊत म्हणाले.
राऊत यांनी फडणवीसांच्या गुन्हेगारीसंदर्भात झिरो टॉलरन्स भूमिका असल्याच्या विधानावरुन टोला लगावला आहे. "झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीस यांनी राज्यात राबवला तर 90 टक्के मंत्रिमंडळ खाली होईल," असं राऊत म्हणाले. मंत्रिमंडळामध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मंत्री असल्याचं राऊत यांना या विधानावरुन सूचित करायचं होतं.
"भुजबळ यांना वगळण्यात जातीय राजकारण आहे," असा आरोप राऊत यांनी यावेळेस बोलताना केला. "भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. ते आपल्या कर्माची फळं भोगत आहेत," असा टोला राऊतांनी लगावला.
"कायदा आणि सुव्यवस्था बाबत राज्यात प्रश्न आहेत. आज परभणी बंद हाक दिली आहे. विधानभनात आमचे विरोधी आमदार कमी आहेत पण ते दमदार आहेत," असं म्हणत राऊत यांनी अधिवेशनात सकारात्मक गोष्टी घडतील असा विश्वास व्यक्त केला.
फडणवीस यांनी ईव्हीएमचा फुल फॉर्म एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र असा सांगितल्यावरुन प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "ते शब्दांच्या कोट्या करतात. त्यांनी अशा कोट्या करायला माणसं ठेवली आहेत. करत रहा आम्ही ते ऐकत राहू," अशी प्रतिक्रिया नोंदवली.
झाकीर हुसैन यांच्या निधनासंदर्भात बोलताना राऊत यांनी त्यांचं असं अचानक जाणं हे लता मंगेशकर यांच्यानंतरचा देशाला बसलेला दुसरा मोठा धक्का असल्याचं म्हटलं. "त्यांनी आमचे कान आणि मन आनंदी केले. त्यांचं हे जाण्याचं वय नव्हतं. आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत. लता मंगेशकर यांच्या नंतर देशाला बसलेला हा दुसरा धक्का आहे," असं राऊत म्हणाले.