मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आता तिसरंच नाव चर्चेत? पुण्याच्या खासदाराने स्पष्टच सांगितलं,`पार्टीचा निर्णय आमच्यासाठी...`
Maharashtra CM News Live: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच नव्या चेहऱ्याची चर्चा समोर येत आहे.
Maharashtra CM News Live: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा आहे. फडणवीसांचे नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता नवा चेहरा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर ही चर्चा रंगली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर स्वतः खासदारांनीच स्पष्ट उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रीपदासाठी वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनीच ट्विट करत उत्तर दिलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनीच ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे, असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
'आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि संसदीय मंडळात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे', असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मुख्यमंत्री भाजपचाच?
दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या माहिती सूत्रांकडून समजतेय. 5 डिसेंबर रोजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. आझाद मैदानावर शपथविधी होणार असून या ठरावाला महायुतीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात 28 नोव्हेंबर रोजी रात्री दिल्लीमध्ये अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान आज मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार या बैठकीला उपस्थित असतील. अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे. तर येत्या दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.