Maharashtra Congress Tweet: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 'फडतूस गृहमंत्री' असा उल्लेख केल्याने भाजपा (BJP) नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण कऱण्यात आल्याने उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. फडतूस गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यातच आता काँग्रेसने एक ट्वीट केलं असून यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामनवमीला काही राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. जातीय सलोखा बिघडू नये यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवा अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने यासंबंधी ट्वीट केलं आहे. दरम्यान, या ट्विटवर महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


गृहमंत्रालयाच्या ट्वीटमध्ये काय?


केंद्रीय गृहमंत्रालयाने हनुमान जयंतीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, सण शांततेत साजरा करणं आणि समाजातील जातीय सलोखा बिघडवणार्‍या घटकांवर राज्य सरकारने लक्ष ठेवावं असं आवाहन अमित शाह यांनी केलं आहे. 



महाराष्ट्र काँग्रेसचं ट्वीट


महाराष्ट्र काँग्रेसने यावर ट्वीट केलं असून "महाराष्ट्राच्या फडतूस गृहमंत्र्यांनी आता त्यांच्या ‘पप्पाची’ तरी ऑर्डर पाळावी, आणि रामनवमीच्या दिवशी जे झालं ते पुन्हा होऊ देऊ नये," असं म्हटलं आहे. 



काँग्रेसने अमित शाह यांच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान ज्या प्रकरणावरुन फडतूस असा उल्लेख केला जात आहे, त्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाण्यात आज महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या जनक्षोभ मोर्चात आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, अनिल परब असे अनेक मोठे नेते उपस्थित आहेत.