सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : एक रुपयात शेतकऱ्यांसाठी पीकविमा (Crop Insurance). जास्तीत जास्त शेतकऱ्यांना (Farmers) लाभ मिळण्यासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना. मात्र याच योजनेच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक होतेय.  शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नावाखाली लुबाडलं जातंय.नांदेड (Nanded) जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यात  असाच घोटाळा समोर आलाय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यात पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. पण शेतकऱ्यांची दिशाभूल करून चक्क सेतू चालकच शेतकऱ्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांनी सेतू सुविधा केंद्रावर पीकविमा भरला खरा. मात्र सेतू केंद्र चालकानेच या शेतकऱ्यांना गंडवलं. 416 शेतकऱ्यांचा पीकविमा या सेतू केंद्र चालकाने काढला. मात्र बँक खात्याचा नंबर स्वत:चा दिला  म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर पीकविमा जमा होईल तेव्हा तो शेतकऱ्यांच्या नव्हे तर थेट सेतू चालकाच्या खिशात जाणार. कंधार तालुक्यातला केंद्र चालक हा उस्माननगरमधील आपल्या घरातून पीकविमा भरण्याचे काम करतो.  फक्त हाच सेतू केंद्र चालक नाही तर इतर तीन सेतू केंद्र चालकांनीही पीकविमा भरताना अफरातफर केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.. 


शेतकऱ्यांची ही फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली असल्याची शक्यता आहे. लाखो रुपये लुबाडण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याआधी सातबारा नांदेडचा आणि विमा बीड  जिल्ह्याचा काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्येच समोर आला होता. तर पीक विम्याच्या पंचनाम्यात खाडाखोड करुन विमा कंपनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.


जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंदर्भात तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. लेखी तक्रारी प्राप्त झाल्याचं तहसीलदारांनीही कबूल केलंय.. लवकरच हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे.. नाव आणि सातबारा शेतकऱ्यांचा मात्र पैसा केंद्र चालकाच्या खात्यात असा गैरप्रकार सुरु आहे.  शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पीकविमा भरणारी चार सेतू केंद्र एकट्या नांदेड जिल्ह्यातलीच असल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्यभर या लुटीचं जाळ पसरल्याचा संशय आहे. त्यामुळे या घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करून अद्दल घटवण्याची गरज आहे... नाहीतर मजबुरीचा फायदा घेत हे सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत.