मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळाला. कालपासून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रलयकारी पुरामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरचा कहर दिसून आला. गेल्या आठवडाभर पाणी ओसरण्याचे नाव घेत नव्हते. राज्यात पुराचे आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात परिस्थिती अधिक वाईट आहे. येथे चारही ठिकाणी केवळ पाणी दिसून येत आहे. एनडीआरएफ, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराचे सैनिक लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच आता मदत कार्याला वेग आला आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे गेले आठ दिवस ठप्प असलेली वाहतूक सुरु झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुरातून वाहून गेलेले तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. ५८४ गावातील ४ लाख ७४ हजार २२६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. विस्थापित झालेल्या लोकांसाठी ५९६ तात्पुरते निवारा शिबिर स्थापन करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात नोंदविण्यात आला आहे. १ जूनपासून १२ ऑगस्टपर्यंतच्या नोंदीनुसार, मध्य महाराष्ट्रात ८५३.७ मिलीमीटर म्हणजे ७४ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला असून, येथील पावसाची सर्वसाधारण नोंद ४९० मिलीमीटर एवढी आहे. कोल्हापूर आणि सांगलीत वर्षभराचा पाऊस तीन दिवसात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुराचे मोठे संकट उभे राहिले.


सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावातील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. काही गावांमध्ये अद्याप थोडा पाणी असले तरी अनेक गावातील पाणी पूर्णपणे ओसरलं आहे. मात्र वारणा, कृष्णा, पंचगंगा या नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये अद्यापही पाच ते सहा फूट पाणी आहे. मागील नऊ दिवस शेतामधले पुराचे पाणी कायम आहे. वारणा नदीच्या तीरापासून जवळपास दीड किलोमीटर परिसरातील शेती अनेक अद्याप पाण्याखाली आहे.