नवी दिल्ली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे, वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी ट्वीट करुन दिली आहे. यात 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असंही गडकरी यांनी सांगितलं.


तसंच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथं रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामं आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचंही काम प्राधान्याने केलं जाईल, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.