विकास गावकर, झी २४ तास, सिंधुदुर्ग : पूरपरिस्थितीनंतर सिंधुदुर्गमध्ये आता नवं संकट उभं ठाकलं आहे. दरड कोसळणं आणि रस्ते खचण्याचं नवं संकट कोकणात उभं राहिलंय. गेल्या दोन दिवसात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीमध्ये रस्ते खचणे, डोंगर कोसळणे असे प्रकार घडत आहेत.


माळीणची पुनरावृत्ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर, सांगलीकरांप्रमाणेच कोकणवासियदेखील पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. कोकणातील पूर आटोक्यात आला असला तरी आता नवं संकट तळ कोकणात उभं राहिलंय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गेल्या दोन दिवसात कणकवलीमध्ये तिवरे, कुडाळमध्ये सरम्बळ, आकेरी याखेरीज सावंतवाडी ते आंबोली तर दोडामार्ग आणि झोळमबेमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी तर रस्ते पूर्णपणे खचले आहेत. तर काही रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.  


अतिवृष्टीमुळे डोंगर खचत असावेत असा अंदाज असला तरी रस्त्यांना भेगा का पडत आहेत? हा प्रश्न आहे. प्रशासनानेही या संदर्भात भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण केलंय.


दरड कोसळण्याच्या या प्रकारामुळे लोक धास्तावलेत. शासनानं तातडीनं याची दखल घेऊन धोक्याच्या छायेतील लोकांना स्थलांतरीत करण्याची गरज आहे. अन्यथा कोकणात माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते.