मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. अनेक जण उघड्यावर आले आहेत. अनेक जण आपआपल्यापरीने मदत करत आहेत. आता पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीकरांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ तासाभरात एक कोटींचा निधी जमा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रातील पुराबाबत शरद पवार यांनी बैठक घेतली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बारामतीमधील संस्था, मंडळे, संघटना या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. माझ्या काही तासांपूर्वीच्या हाकेला प्रतिसाद देत नागरिक आणि प्रतिनिधींनी अवघ्या एक तासात सुमारे एक कोटी रुपयांची वर्गणी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अन्य भागातील पूरग्रस्त पीडितांना मदत म्हणून दिली आहे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.



साखर कारखाने, व्यापारी संस्थांनी साखर, धान्य, नवे कपडे, औषधे या गोष्टी देखील देण्याचे जाहीर केले. कोणत्याही आपत्ती प्रसंगी संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यास बारामतीकरांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. बारामतीकरांचा मला अभिमान वाटतो. सर्व दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे मनापासून आभार, असे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.



दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसामुळे महापुराने वेढा घातला. दोन्ही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सध्या कमी झाले असले, तरी पूर स्थिती जैसे थे आहे. अनेक गावांमध्ये बचाव पथकाचे काम सुरू आहे. कोल्हापूर सांगलीमधील पुरग्रस्तांसाठी प्रत्येकजण मदतीसाठी धावून येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केले आणि काही मिनिटातच तब्बल एक कोटी रूपयांचा निधी जमा झाला. यामध्ये पवार यांनी देखील विद्या प्रतिष्ठान संस्थेचेवतीने ५० लाख रुपयांचा निधी देऊन मोठे योगदान दिले. शरद पवार आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  



सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २५ लाख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २५ लाख असे एकूण ५० लाख रूपयांची निधी दिली जाणार असल्याची पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. राज्यातील पूर परिस्थितीबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.