Government New Ministers Coat: राजकारणात शपथविधीच्या कोटला फार महत्व आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आमदारांच्या कोटची चर्चा आहे. अनेकांनी आयत्यावेळेला धावपळ नको म्हणून कोट शिवून तयार ठेवलेत. सध्या कोणताही नेता सूटबूट कोट अशा पेहरावात दिसला की त्याची चर्चा होते. 5 डिसेंबरला कुणाच्या कोटाची घडी मोडणार याची उत्सुकता निर्माण झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात बंद गळ्याचा कोट आणि सत्तापद हे समीकरण आहे. मुख्यमंत्री किंवा मंत्री झाल्यावर शपथविधीला कोण कोणता कोट परिधान करणार याचीच चर्चा असते. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसमध्ये नानांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा होती. पण निकालानं त्यांच्या बंद गळ्याच्या कोट घालण्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता महायुतीत कोणत्या आमदाराने कोट शिवलेत याची चर्चा सुरु झालीये. स्टाईलिश आणि फॅशनेबल नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ सुंदर कोट घालून माध्यमांना सामोरे गेले. माध्यमांच्या नजरेतून ही बाब सुटली नव्हती.भुजबळांची पत्रकार परिषद संपता संपता पत्रकारांनी कोटाचा मुद्दा छेडलाच.त्याला भुजबळांनी हे असं हजरजबाबी उत्तर दिलं.


भुजबळांचा मंत्रिपदाचा कोट पक्का आहे पण अडीच वर्ष मंत्रिपदानं हुलकावणी दिलेल्या शिवसेना आमदार भरत गोगावलेंची गोष्टच न्यारी. महायुतीची सत्ता आल्यापासून गोगावलेंना मंत्री झाल्यासारखं वाटतंय. त्यांना मंत्रिपदाच्या कोटाबाबत विचारलं असता त्यांनी चार-चार कोट शिवून तयार ठेवल्याची कबुली दिली.


देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील पिंटू मेहाडिया या टेलरकडून कोट शिवतात. यावेळी पिंटू मेहाडिया यांनी फडणवीसांनी सांगितलं नसतानाही फडणवीसांच्या आवडीच्या रंगाचे चार कोट शिवलेत. हे चार कोट घेऊन पिंटू मेहाडिया नागपूरहून थेट मुंबईला विमानानं रवाना झालेत.


प्रत्येक शपथविधीवेळी सगळ्यांच्याच कोटाची घडी मोडते असं नाही.पुढच्या चोवीस तासांत कुणाच्या कोटाची घडी मोडणार आणि कुणाचा कोट कपाटात बंद होणार हे स्पष्ट होणार आहे.


मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? 


आझाद मैदानावर महाशपथविधीची जोरदार तयारी  सुरू आहे. शपथविधीचा ग्रँड सोहळा यशस्वी करण्यासाठी भाजप नेत्यांकडून आढावा बैठका घेण्यात येत आहे.  सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे नेते आझाद मैदानावर तयारीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शिवसेनेचे नेते नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. कालच्या नाराजीनंतर महायुतीची एकजुट दाखवण्याकरता भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पाहणी केली. भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी आझाद मैदानाची पाहणी करत आढावा घेतला.  महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं यावेळी या नेत्यांनी स्पष्ट केलं.शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना अजूनही महत्त्वाची खाती, मुख्यमंत्रिपद आणि कोणाला किती मंत्रिपदे द्यायची? यावरून महायुतीत एकमत झालेलं दिसून येत नाही.  त्यातच महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. त्यामुळे आता पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.