आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांवर एकूण 270 कोटी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे अर्थसंकल्पात विविध महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर अधिक भार वाढलेला असताना आता कोट्यवधी रुपये फक्त जाहिरातींवर खर्च केले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन राज्य आणि इतर राज्यात जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये बाह्यप्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख, डिजिटल माध्यमांसाठी 51 कोटी आणि राज्यातील आणि राज्याबाहेरील वर्तमानपत्रातून प्रसिद्धीसाठी 40 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. 


शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जाहिरातींवर झालेल्या खर्चावरून विरोधकांनी टीका केली होती. पुन्हा एकदा याच मुद्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घटकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री तीर्थस्थळ योजना या आणि अशा अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडणार आहे याची जाणीव देखील आता राज्य सरकारला झाली आहे. त्याचसोबत वित्त विभागाने दुखील वित्तीय तूट दाखऊन दिल्याने आगामी दिवसांत सरकार समोरील आव्हाने वाढण्यासाठी शक्यता आहे.