जालना: आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी  हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात  कोरोनाची चाचणी करणाऱ्या दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोहचली आहे. येणाऱ्या  काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते रविवारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या  माध्यमातुन नागरिकांना कोरोना विषाणुची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे.  आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबीवर भर देण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची  तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आगामी काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या ऑनलाईन कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब‍ दानवेही उपस्थित होते. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोनासंबंधी योग्य ती उपाययोजना करत असून नागरिकांनी आता स्वत:हुन पुढे येऊन कोरोना संबंधीची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन नागरिकांना प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरज पडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी पालकमंत्री  राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात  उभारण्यात आलेल्या बी.एस.एल. -3 या आधुनिक पध्दतीच्या  प्रयोगशाळेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करुन रुग्णांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत.   आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणु, जीवंत राहू शकणार नाही अशा पध्दतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

कोव्हीड बरोबरच या प्रयोगशाळेत अनुवंशिकते संबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेच्या  माध्यमातुन आपणांस  दररोज लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवाशितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करुन कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच कोव्हीड बाधितांवर  तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे तसेच प्लाझ्मा थेरपी व ॲन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.