मुंबई : पनवेलजवळच्या तळोजा औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग सध्या गुजरातच्या वाटेवर आहेत. 


महत्वाची औद्योगिक वसाहत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळोजा औद्योगिक वसाहत ही महाराष्ट्रातील महत्वाच्या औद्योगिक वसाहतींपैकी एक आहे. इथे जवळपास साडेसहाशे लहानमोठे कारखाने आहेत. यात बरेचशे रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्याही जुनीच आहे. 


कारणे दाखवा नोटीस


या प्रदूषणाच्या मुद्दयावरून मात्र तळोजा औद्योगिक वसाहतीत सध्या वातावरण गढूळ झालं आहे. या प्रदूषणाच्याच मुद्दयाचा वापर करून अनेक कारखान्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावल्या जात आहेत. त्याबरोबरच कारखाने बंद केले जात आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेला कारखाने बंद पाडण्यातच रस असल्याचं दिसून येतंय.


प्रकल्प गुजरातला


तळोजातल्या या परिस्थितीमुळे काही मोठे उद्योग गुजरातला स्थलांतरीत होता आहेत. यात दीपक फर्टिलायझर, दीपक नायट्रेट, गॅलक्सी, केलॉग्ज, नूर फूड्स, व्हीव्हीएफ, उल्का सीफूड्स यासारख्या कंपन्यांनी नवीन विस्तार प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.


सरकारी अनास्था


प्रदूषणाची समस्या सोडवली पाहिजे यावर कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. यासाठीच प्रदूषित पाण्यावर आणि रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 'सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प' उभारण्यात आला आहे. त्यावर कोणाचं वर्चस्व असावं यावरून उद्योजकांच्या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. यातच स्थानिक नगरसेवकाने हरित लवादाकडे तक्रार केली आहे. सरकारी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीमिळून कारखान्यांना अडचणीत आणत आहेत अशी तक्रार केली जातेय. सरकारी यंत्रणेने प्रदूषणाच्या  प्रश्नावर कारखान्यांना मदत करून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं उद्योजकांचं म्हणणं आहे.
कारण काही असो उद्योगांबद्दलच्या अनास्थेमुळे महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातायेत एवढं नक्की.