सोलापूर : जोपर्यंत मराठी अस्मिता आणि मराठी शक्ती एकत्र एकवटत नाही. तोपर्यंत कर्नाटक सीमावाद प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, महाविकास आघाडी सरकारच सीमावाद सोडवू शकते. अन्यथा हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असेही ते म्हणाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमाप्रश्नी लवकरच महाराष्ट्र विधिमंडळात ठराव संमत करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरु असून त्याला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटून या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. 


एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शिवसेना नेते संजय राऊत यांनी कश्मीर फाईल्सपेक्षा बेळगांव फाईल्स गंभीर असल्याचं व्यंगचित्र ट्वीट केले. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त विधान केलंय.


महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न हा वाद अस्तित्वातच नाही. हा वाद कधीच संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रातील नेते तेथील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा वाद उकरून काढतात, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. 


सोलापूर, अक्कलकोट या परिसरात कन्नड भाषिकांची मोठी संख्या आहे. केंद्र सरकारने 1956 साली भाषावार प्रांतरचना केली. त्यावेळी हा भाग महाराष्ट्राला दिला. हा भाग महाराष्ट्राला दिल्यामुळे बेळगाव हे कर्नाटकला मिळाले, असा दावाही बोम्मई यांनी केला आहे.