वृद्धाने तरुण मित्राला घरी बोलवले, समलैंगिक संबंधाची मागणी केली पण...; अंबरनाथमध्ये घडला एकच थरार
Elderly Man Found Dead In His House: अंबरनाथमध्ये तरुणानं वृद्धाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया
Mumbai Crime News Today: अंबरनाथमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे कारण ऐकताच पोलिसही चक्रावले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Elderly Man Found Dead In His House)
काय घडलं नेमकं?
अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात राहणारे कृष्णानंद मुनियार हे एका खाजगी कंपनीत कामाला होते. मुनियार हे अंबरनाथ येथे असलेल्या चिखलोली पाड्यातील मगर चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होते. तिथे ते एकटेच राहत होते. रविवारी रात्री कृष्णानंद मुनियार यांनी त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी बोलवलं होतं. मित्राला दारू पिण्याच्या बहाण्यानं रूमवर झोपायची गळ घातली. रूमवर जाताना दोघेजण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाले आहेत.
मित्राला घरी बोलावले होते
मद्यपान करून झाल्यानंतर मुनियार आणि त्यांचा मित्र दोघेजण झोपी गेले. याचवेळी मयत कृष्णानंद मुनियार यांनी सोबत आलेल्या त्यांच्या मित्राला शारिरीक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. मुनियार यांच्या मित्राने त्यांना नकार दिला मात्र तरीही त्यांनी समलैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. हाच राग आरोपीने मनात ठेवला होता. रागाच्या भरात आरोपीने मुनियार यांच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
दार न उघडल्यामुळं शेजाऱ्यांना संशय
मुनियार यांची हत्या केल्यांनतर आरोपी तिथून फरार झाला. सकाळी पाणी भरण्यासाठी मुनियार अजूनही घराबाहेर न पडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी सुरुवातीला त्यांचे दार वाजवले. मात्र आतमधून काहीच प्रतिसाद आला नाही. मुनियार दार उघडत नसल्यानं शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. तेव्हा मुनियार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. शेजाऱ्यांनी लगेचच पोलिसांना ही माहिती दिली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुनियार यांचा मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने संशयित ताब्यात
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यांना त्यात मुनियार त्याच्या मित्रासोबत घराकडे जाताना दिसत होते. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तीन ते चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुनियार यांची हत्या समलैंगिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून झाली की अजून कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.