Maharashtra MLA Disqualification : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज महत्त्वाचा निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींवरील घटनात्मक वैधतेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ या प्रकरणावर महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे या निकालाआधाची सत्तासंघर्षाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वशीकरण करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"एकनाथ शिंदे जादु टोना छु छा करतात. ते गावाकडे जादूटोना करण्यासाठी गेले होते. एकनाश शिंदे यांच्या तोंडात पांढरे दाणे असतात आणि त्याच्या माध्यमातून ते समोरच्या लोकांना वशीकरण करतात," असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.


"पक्षांतर बंदीच्या कायद्यानंतर अध्यक्षांनी सांगितले आणि व्हीप जारी केला आणि त्यांनी आदेश पाळला नाही. आताचे अध्यक्षसुद्धा गद्दार आहेत. भाजपचे असले तरी ते गद्दार आहेत. आताचे सरकार काही क्षणात कोसळेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा विजय होईल," असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.


"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा विजय झाला पाहिजे.मी न्यायमूर्तींना विनंती करु शकत नाही, देवाला करु शकतो. शिवाजी महाराज म्हणत होते, गद्दारांना क्षमा नाही. त्यांनी पक्षाचा, जनतेचा विश्वासघात केला आहे," असे चंद्रकांत खैरे म्हणाले.


"संदीपान भुमरेंनी जनतेला दारुच्या व्यसनी लावले हा काय करेल, येऊद्या मैदानात. भुमरे आज जाणार आहेत. गेल्यावर तुम्हाला कोण विचारणार? त्यांनी फक्त दारुची दुकाने सुरू केली आहेत," असाही आरोप खैरे यांनी केला आहे.



उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास अडचण नाही - विजय वडेट्टीवार


"निकाल नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल असे आम्हाला वाटत आहे. मागच्या अध्यक्षांनी जी नोटीस बजावली तो निर्णय सर्वोच्च न्यायालय तो निर्णय एका कालमर्यादेत तत्कालीन अध्यक्षांकडे पाठवतील आणि निर्णय घेण्यास सांगतील. पुन्हा अन्याय झाल्या सारखे असे वाटल्यास सर्वोच्च न्यायलायत जाऊ शकता येईल. सरकार घटनाबाह्य झाल्यास पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास अडचण नाही," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.