Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही काळापासून अवकाळीनं उसंत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही राज्यावर असणारा हवमानाचा रुसवा काही दूर गेलेला नाही, हेच आता स्पष्ट होत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये लक्षणीय तापमानवाढ झाली असून, या उष्णतेचा दाह अनेकांनाच सोसेनासा झाला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात हीच परिस्थिती असताना मायानगरी मुंबईसुद्धा होरपळून निघताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जवळपास 34 ते 35 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असली तरीही या उष्णतेचा दाह मात्र 40 अंशांइतका जाणवत असल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच भल्या पहाटे शहरावर येणारे पावसाळी ढग पाहता, उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी ते नेमके कधी बरसणार हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. मुख्य म्हणजे मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान आणि हवामानाची ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून, आर्द्रतेचं प्रमाणही जास्त राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यामुळं आता उन्हापासून सुटका नाही हेच स्पष्ट होत आहे. 


राज्यातील विविध भागांमधील तापमानाचा आकडा 


मुंबई 34.1°
पुणे 37.8°
नाशिक 38.6°
कोल्हापूर 39.6°
सातारा 39.8°
सांगली 40.6°
जालना 41°
नांदेड 41.8°
जळगाव 43.2°


देशभरात पश्चिमी झंझावाताचे कमीजास्त परिणाम 


सध्याच्या घडीला देशात सक्रीय असणारा पश्चिमी झंझावात जम्मू काश्मीरच्या क्षेत्रावर चक्रीवादळसदृश वाऱ्यांच्या रुपात घोंगावताना दिसत आहे. ज्याचा एक झोत बिहारहून छत्तीसगढच्या दिशेनं तर, दुसरा विदर्भावरून तामिळनाडूच्या दिशेनं जाताना दिसत आहे. 


परिणामी पुढील 24 तासांमध्ये देशाच्या पूर्वोत्तर क्षेत्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहार, सिक्कीम, केरळ या भागांमध्ये मध्यम स्वरुपातील पाऊस बरसू शकतो. तर, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, दक्षिण कर्नाटक आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगतच्या क्षेत्रावरही पावसाचं सावट असेल. असं असलं तरीही देशातील हा पाऊस मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी. 


हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! ऐन रविवारी मुंबईकरांचा खोळंबा; Mumbai Local कडे पाहूच नका 


अंदमानात मान्सून दाखल 


हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनचं आगमन दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात झालं आहे. पुढील 3 ते 4  दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.