मोठी बातमी! ऐन रविवारी मुंबईकरांचा खोळंबा; Mumbai Local कडे पाहूच नका

Mumbai Local News : नवी मुंबई आणि मुख्य शहराला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं तुम्ही या दिवसामध्ये कुठे बाहेर जाण्याच्या विचारात असाल, तर बेत बदलावा लागू शकतो.   

सायली पाटील | Updated: May 20, 2023, 08:10 AM IST
मोठी बातमी! ऐन रविवारी मुंबईकरांचा खोळंबा; Mumbai Local कडे पाहूच नका  title=
Mumbai local Mega block central railway latst updates

Mumbai Local News : सुट्टीचा दिवस म्हटलं की अनेकांचेच पाय भटकंतीसाठी निघतात. मुळात भटकंती हा अनेकांचाच आवडीचा छंद. पण, या Weekend ला तुम्ही कुठे फेरफटरा मारायच्या विचारात असाल तर हा बेत बदलावा लागू शकतो. त्यातही रेल्वे मार्गानं तुम्ही प्रवास करु इच्छिता तर हा विचारच सोडा. कारण, रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात येत आहे. 

कोणत्या मार्गावर आणि कोणत्या वेळेत असेल मेगा ब्लॉक? 

रविवारी म्हणजेच 21 मे 2023 रोजी सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 पर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. ज्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) येथून सकाळी 10 वाजून 25  मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंतच्या वेळेत धावणाऱ्या डाउन जलद मार्गावरील रेल्वे माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. इथून ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या संपूर्ण प्रवासामध्ये साधारण 15 मिनिटांचा उशीर अपेक्षित आहे. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत अप जलद मार्गावरील रेल्वे मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. इथंही किमान 15 मिनिटांचा उशीर अपेक्षित आहे. 

हार्बर मार्गावर काय परिणाम? 

पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. इथे सीएसटीच्या दिशेनं जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान पनवेल - बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील. दरम्यानच्या काळात पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : Weather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला कोण रोखणार?

प्रवाशांची पूर्णपणे गैरसोय होऊ नये यासाठी ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. तर, ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. किंबहुना या कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसारच धावतील असंही रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.