नांदेड : भारतीय पोलीस सेवा 1995 बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर, यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपति पदक घोषित करण्यात आलं आहे. प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान हा देशातील पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना दिला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली 26 वर्ष देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्य आणि सीआरपीएफमध्ये उत्कृष्टरित्या सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी 8 विभिन्न पदके देवून सन्मानित करण्यात आलं असून त्यात राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक, 2 वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखण्ड यांचे शौर्य पदक,  राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक व केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक इत्यादींचा समावेश आहे.


बिहार व झारखंड राज्य सरकार द्वारा त्यांना यापूर्वी अनेक प्रसंगी पुरस्कृत करण्यात आलेले असून सीआरपीएफमध्ये गडचिरोली व नागपुर इथे डीआयजी तसंच रांची व मुंबई इथे आयजीपी म्हणून नक्षलविरोधी मोहिमेत बजाविलेल्या उत्कृष्ट कामगिरी व प्रशासनासाठी 11 डीजी, सीआरपीएफ प्रशंसा डिस्क देण्यात आलेली आहेत. तसंच संजय लाठकर यांना आत्तापर्यंत 60 पेक्षा अधिक प्रशस्तिपत्रेही मिळालेली आहेत.


महाराष्ट्र राज्यात संजय आ. लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले असून त्यांना महाराष्ट्र शासनाने 2 वेळा सन्मान पत्र व राज्य अल्पसंख्याक आयोगाने महात्मा गांधी शांतता पुरस्कार देवून गौरविलेलं आहे.