Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये स्थापन होत असून या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीसांबरोबरच राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथ विधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असतानाच आता या शपथविधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही दिसू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे या सर्व नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.


असा असणार शपथविधी सोहळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस यांची भाजपाच्या विधीमंडळ पक्षाचे गटनेता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली. या निमंत्रण पत्रिकेमध्येच शपथविधी सोहळा हा मुंबई महानगरापालिकेच्या इमारतीसमोर फोर्ट परिसरात असलेल्या आझाद मैदानात येथे होणार हे स्पष्ट झालं. सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा पार पडणार असून त्याची जय्यत तयारी मागील काही दिवसांपासून सुरु होती. या सोहळ्यासाठी अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने आझाद मैदान परिसरामध्ये 5 हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.


भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदारही या शपथविधी सोहळ्यात शपथ घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असतानाच आता या सोहळ्याला विरोधकांचीही हजेरी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.


नक्की वाचा >> मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना किती पगार मिळणार पाहिलं का? Per Month Salary थक्क करणारी


त्या तिघांनाही आमंत्रण


महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने राजकीय परंपरेला अनुसरुन शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना या कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवल्याची माहिती समोर येत आहे. आता या आमंत्रणाला मान देऊन शपथविधीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार का? याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शपथविधीसाठी काही तास शिल्लक असतानाही याबद्दल या तिन्ही नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांना औपचारिक आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यामुळेच आता संध्याकाळी विरोधकांपैकी कोणते चेहरे या सोहळ्यात दिसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.थेट हे मोठे नेते उपस्थित राहिले नाही तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या फळीतील नेत्यांना या सोहळ्यासाठी पाठवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


नक्की वाचा >> सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?


उद्धव-आदित्य गैरहजर राहणार


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उध्दव ठाकरे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे.