Dog Death Anniversary : एखाद्या व्यक्तीचे निधन  झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करुन तेरावं घातलं जाते. तसेच वर्षभरानंतर वर्षश्राद्ध घातले जाते. ठाण्यात एका कुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध घालण्यात आले. जाधव कुटुंबियांचा हा कुत्रा आहे. भटजींना बोलावून वर्षश्राद्धाच्या सर्व विधी करण्यात आल्या तसेत अन्नदान देखील करण्यात आले. वर्षश्राद्धाच्या वेळी  जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात लाडक्या कुत्र्याच्या आठवणीने अश्रु तरळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्याच्या खोपट येथील दर्शन टॉवर मध्ये राहणाऱ्या किरण जयवंत जाधव यांच्या कुत्र्याचे वर्षश्राद्ध घालण्यात आले.  जाधव यांच्या पोमेलीयन कुत्र्याचं आज वर्षश्राद्ध ठाण्याच्या कोपनेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले. किरण जाधव यांचा मुलगा केतन यांनी हे कार्य आज केलं तर गुरुजी सचिन कुलकर्णी यांनी विधी पार पाडले. 


या कुत्र्याचं गेल्यावर्षी 28 मे रोजी निधन झालं होते. त्यावेळीही माणसाप्रमाणे त्याचे विधी करण्यात आले होते. या कुत्र्याचं नाव शीरो असून मागील पंधरा वर्षांपासून शिरो जाधव कुटुंबियांसोबत राहत होता. जाधव कुटुंबियांनी शिरो याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्याच नामकरण सुद्धा त्यांनी शिरो जाधव असंच केलं होते. आपल्या पाळीव जनावरा विषयी इतका जिव्हाळा दाखवणाऱ्या जाधव कुटुंबाची सध्या ठाण्यात जोरदार चर्चा होत आहे.


बैलाच्या तेराव्याला पुरणपोळीचं गावजेवण


भोरमधील गवडी गावाच्या बाजीराव साळुंके या शेतकऱ्याने त्याच्या बैलाच्या तेराव्याचा विधी माणसांप्रमाणे केला. पोटच्या मुलाप्रमाणे 25 वर्षे सांभळलेल्या पाखऱ्या नावाच्या  बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. बैलाच्या तेराव्याला पुरणपोळीचं गावजेवण दिलं. पंचक्रोशीत सांळुंकेंच्या बैलप्रेमाची चर्चा रंगली. 


गाईच्या आठवणी जागवत कीर्तन


सोलापुरात माळशिरस तालुक्यातील शेतकरी जोतिराम आवताडे यांनी आपल्या गाईच्या प्रथम वर्षश्राद्ध्याचा कार्यक्रम जोरदार केला. यावेळी गाईच्या आठवणी जागवत कीर्तन ठेवण्यात आलं. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील अनेक कार्यक्रमांत या गाईनं प्रथम क्रमांक पटकावला होता. या गाईमुळे आवताडेंना ओळख मिळाली होती. 


कुत्र्याच्या वाढदिवात चक्क 7 लाखांची उधळपट्टी


गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका पाळीव कुत्र्याच्या वाढदिवात चक्क 7 लाखांची उधळपट्टी करण्यात आली. निकोल भागात तीन तरुणांनी अॅबीनावाच्या कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला. कुत्र्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली. 


राहीबाई पोपेरे यांच्या कुत्र्याचा वाढदिवस 


आतापर्यंत आपण मुलांचे किंवा घरातील ज्येष्ठांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे झाल्याचं पाहिल आहे. पण, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या बाळू नावाच्या कुत्र्याचा नुकताच वाढदिवस साजरा केला. बाळुनं त्यांच्या कुटुंबियांचं सातत्यानं रक्षण केलंय. त्यामुळे तो आपल्या घरातला सदस्यच असल्याचे राहीबाई यांनी सांगितले.