गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणीत एक विचित्र घटना समोर आली आहे. मुलाच्या दुचाकीवरुन जाताना आईचा मृत्यू झाल्याने वडिलांनी थेट मुलाविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. परभणीतल्या सेलू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
जालना जिल्ह्यातील मंठा इथं राहणारे गणेश आसाराम मिसाळ आणि त्याची आई संजीवनी आसाराम मिसाळ हे दोघे 4 मे 2022 रोजी दुचाकीने परभणी जिल्ह्यातील कोल्हा पाटी इथं लग्नाला आलं होतं. लग्न आटोपून ते दोघे त्याच दुचाकीवरून जालना जिल्ह्यातील मंठा या त्यांच्या मूळ गावाकडे सेलू मार्गे निघाले होते. 


दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील डिग्रस पाटीजवळ संजीवनी मिसाळ दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  शव विच्छेदनानंतर  त्यांच्या मूळ गावी संजीवनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


आपल्या पत्नीच्या मृत्यूस मुलगाच जबाबदार असल्याचं आरोप करत आसाराम मिसाळ यांनी मुलगा गणेशविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलगा भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याने संजीवनी मिसाळ दुचाकीवरुन पडल्या असा दावा आसाराम मिसाळ यांनी केला आहे. 


आपल्याच मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यात या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.