गणेश मोहाळे, झी मीडिया, वाशिम :  जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करता येते, हे सिद्ध केलंय वाशिममधल्या नितेश चंद्रकांत जाधव या तरुणाने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरची आर्थिक परिस्थिती बिकट, दोन वेळचं खायचीही भ्रांत. पण परिस्थितीचा बाऊ न करत नितेशने प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. 


वाशिम जिल्ह्यातील कांरजामधील हमालाच्या मुलाने मर्चंन्ट नेव्हीमध्ये इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफिसर सारख्या महत्वाच्या पदाला गवसणी घालत आपल्या वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. 


नितेशचे वडील चंद्रकांत जाधव हे कांरजा बाजारसमितीत हमालीचं काम करतात, तर आई गृहीणी आहे. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण मुलांनी भरपूर शिकावं, चांगली नोकरी करुन नाव कमवावं यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरु होती. आपल्या वडिलांची मेहनत नितेशनेही वाया जाऊ दिली नाही.


नितेशने कांरजा इथल्या न प शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर बी ई इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली.  इतर मुलांप्रमाणेच नितेश शासकीय सेवेत नेाकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे शासकिय सेवेत नेाकरी मिळणे कठीण असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानं त्याने संप्टेबर 2021 मध्ये मर्चंट नेव्हीची परीक्षा दिली आणि त्यात 81 टक्के गुण संपादन केले. 


मर्चंन्ट नेव्हीत अधितकारी पदावर नियुक्त झालेल्या नितेशला दोन लाख रूपये प्रतिमहिना वेतन मिळणार आहे. कांरजातील नितेश जाधवची जिद्द आणि चिकाटी ही युवा पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरली आहे.