Maharashtra Political Crisis : कोल्हापूर (Kolhapur) ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाडगे (Samarjitsinh Ghadge) हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय विरोधक हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडल्याने समजितसिंह घाडगे प्रचंड नाराज असल्याची म्हटलं जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून समजितसिंह घाडगे हे नॉट रिचेबल आहेत. समजितसिंह घाडगे हे हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतलेल्या दिवसापासूनच नाराज आहेत. यासंदर्भात घाडगे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र घाडगे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला अपयश आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समजितसिंह घाडगे हे मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मुश्रीफ यांनी शपथ घेण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यांना सोबत घेऊ नका असे सांगितले होते. गेल्या 10 वर्षांपासून मुश्रीफ आणि समजितसिंह घाडगे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. समजितसिंह घाडगे यांनी अपक्ष हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 


मुश्रीफ यांनी सोबत घेतल्याने माझी राजकीय कारकिर्द कशी चालणार अशा प्रकारचा सवाल घाडगे यांनी उपस्थित केला होता. राष्ट्रवादीचे आमदार सोबत येत असतील तर घ्या पण मंत्रिपद देऊ नका अशा प्रकारची अटही घाडगे यांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद दिलं आहे. त्यामुळे समजितसिंह घाडगे प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी  We Support Raje अशा प्रकारचे कॅम्पेनिंग सोशल मीडियावर सुरु केली आहे. त्यामुळे आता समरजितसिंह घाडगे समोर येऊन भूमिका मांडणार की दुसरा काही विचार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने कागलच्या राजकारणात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची कोंडी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हे सलग पाचवेळा आमदार झाले आहेत. त्यानंतर 2019 मध्ये मुश्रीफ यांना  भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत घाटगे यांनी तब्बल 88 हजार मते मिळवली होती.