Sharad Pawar : भाजपला संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना मोठं बहुमत हवं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. इंदापूरात शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी हे विधान केलं आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनीही असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र शरद पवार यांच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या भुलथापांना लोकांनी बळी पडू नये असं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपादरम्यान, घटना बदलण्यासाठी भाजपला 400 पार जागा हव्या आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यानंतर आता इंदापूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पुन्हा एकदा याचा उल्लेख केला. यावर भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.


शरद पवारांच्या भुलथापांना बळी पडू नका - चंद्रशेखर बावनकुळे


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे. भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार. उलट मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही. जय संविधान!," असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.



शरद पवार काय म्हणाले?


"भाजपचे एक खासदार राज्यमंत्री होते आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितले की आम्हाला घटना बदलायची आहे. घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या पंतप्रधानांना द्या. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना लोकांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या हे मी समजू शकतो. पण घटना बदलायची त्यासाठी ताकद पाहिजे आणि ते काम तुम्ही करावे हे भाजपचा मंत्री सांगतो. हाच धोका देशाच्या समोर आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं होतं.