`मविआ`मधील पक्षात प्रवेश करणार का? संभाजीराजे स्पष्टच म्हणाले, `राज्यातील जनतेच्या...`
Chhatrapati Sambhaji Raje On Maha Vikas Aghadi Offer: लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा राज्यसभेचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजी राजे यांनी अनेकदा बोलून दाखवली असतानाच त्यांना एक ऑफर देण्यात आल्याचे समजते.
Chhatrapati Sambhaji Raje On Maha Vikas Aghadi Offer: राज्यसभेचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजे लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक असून महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी बातमी गुरुवारी समोर आली. अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी यापूर्वीच केलेली. मात्र, संभाजीराजेंना कोणत्याही पक्षानं जाहीरपणे पाठिंबा जाहीर केला नव्हता. अशातच महाविकास आघाडीने संभाजीराजे यांना लोकसभेचे तिकीट देऊ अशी ऑफर दिल्याची माहितीसमोर आली. महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना तिकीट देताना एक अट ठेवण्यात आल्याचं समजतं. ही बातमी समोर आल्यानंतर संभाजी राजेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
संभाजीराजेंना काय ऑफर देण्यात आली?
संभाजीराजेंनी सध्या तरी लोकसभा निवडणुकीमध्ये एकला चलो अशी भूमिका घेतली आहे. मात्र, महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजेंना पाठिंबा देण्यापेक्षा राजेंना थेट आघाडीत घेण्याचा महाविकास आघाडीचा विचार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिकीट पाहिजे असेल तर संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करावा लागेल, अशी अट ठेवण्यात आल्याचं समजतं. ही अट संभाजीराजेंनी मान्य केल्यास महविकास आघाडी त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यास तयार आहे. संभाजीराजेंनी कोणत्याही एका पक्षात प्रवेश केल्यास कोल्हापूरमधून उमेदवारी देण्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या या ऑफरबाबत राजे काय भूमिका घेणार? अट स्वीकारल्यास राजे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. अशातच आता संभाजीराजेंनी या ऑफरवर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
संभाजीराजे या ऑफरवर काय म्हणाले?
संभाजीराजेंनी आपल्या अधिकृत 'एक्स' (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवताना कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे," असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
वर्षभरापूर्वीच केली पक्षाची स्थापना
संभाजीराजेंनी मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी 2024 च्या निवडणुकीला स्वराज्य पक्ष सामोरे जाणार आहे. शेतकरी आणि कामगारांना केंद्रबिंदू धरून पंचसूत्री प्रमाणे काम करणार असल्याची घोषणा पक्ष संस्थापक असलेल्या संभाजीराजेंनी केली होती. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मागील वर्षी मार्च महिन्यात झालेल्या स्वराज्य पक्षाच्या पहिल्याच सभेत संभाजीराजेंनी हे विधान केलं होतं. प्रसंगी समविचारी पक्षाला सोबत ही घेतले जाईल असंही संभाजीराजे म्हणालेले.