Maharashtra Politics : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर सुरु झाल्याचा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. अशातच पुण्यात चांदणी चौकात (chandni chowk) होणाऱ्या रस्ता आणि पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत का अशी चर्चा सुरु आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एनडीए (चांदणी) चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटान होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसणार आहे. याबाबत बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "विरोध पक्षनेते काय बोलतात, महत्वाचं पद आहे. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही आहे. त्यामुळे आम्हीच त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. आराम करण्यासाठी ते त्यांच्या मुळगावी गेले असल्याने ते आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नये," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


देशपातळीवर आम्ही मोदींना पाठिंबाही दिलेला आहे - अजित पवार


मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. याबाबत तुम्हाला काय त्रास आहे? असा प्रश्न आता अजित पवार यांनी विचारला आहे. "अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसांनी आढावा बैठक घ्यायचो आणि गती द्यायचं काम आम्ही करतो. आताही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतो आहे. देवेंद्र फडणवीस आमच्यासह आहेत, इतर सहकारीही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांच्याकडे या समितीची जबाबदारी आहे. आम्ही सरकार मध्ये जाण्याचं कारणच हे होतं की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना देशपातळीवर आम्ही मोदींना पाठिंबाही दिलेला आहे," असेही अजित पवार म्हणाले.


तुम्हाला काय त्रास होतो?


"मी या राज्याचा अर्थमंत्री म्हणून कामांचा आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असतो. मोपलवारही बैठकीला होते. पण काहींनी वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं, अरे तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असतील तर काय अडचण आहे? यंत्रणा हलवली की कामं मार्गी लागतात. मी आज आढावा घेतला तरीही मुख्य निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच असणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. लोकांची कामं झाली पाहिजेत म्हणून आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगा, आम्ही लक्ष देऊ, राज्याचा विकास होणं आवश्यक आहे," असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.