Maharashtra Politics : शरद पवार (Sharad Pawar) नावाच्या 80 वर्षांच्या राजकीय संघर्षयोद्ध्यानं महायुतीचे मोहरे फोडायला सुरूवात केलीय. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येतंय. कागलमध्ये (Kagal) समरजित घाटगेंच्या (Samarjeet Ghatge) रुपानं भाजपचा चेहरा आणि मोठा मोहरा पवारांच्या गळाला लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) खास निकटवर्तीय अशी घाटगेंची ओळख. मात्र भाजपला रामराम ठोकून घाटगेंनी आता पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात घाटगेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात शरद पवारांना तगडा उमेदवार मिळालाय..


पवारांनी फोडला भाजपचा मोहरा 
समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. 2019 च्या निवडणुकीत भाजपनं घाटगेंना तिकीट नाकारलं होतं. तेव्हा घाटगेंनी मुश्रीफांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली
या निवडणुकीत मुश्रीफांनी घाटगेंचा पराभव केला. अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ देखील महायुती सरकारमध्ये सामील होऊन मंत्री झाले. तेव्हापासून घाटगे नाराज होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी केली. त्यामुळंच आता शरद पवारांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घाटगेंनी घेतलाय.


काय म्हणाले समरजीत घाटगे
लोकसभा निवडणुकी आधीच शरद पवार आणि जयंत पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला होता, पण युती धर्म मोडणे माझ्यासाठी योग्य नव्हतं.. त्यामुळे निवडणुकीनंतरच मी शरद पवार आणि जयंत पाटील याना भेटून तुतारी हातामध्ये घेण्याचा निश्चित केलं असं समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय. शरद पवार हे राजकारणातले वस्ताद म्हणून ओळखले जातात. माझ्या रूपाने टाकलेला कदाचित पहिला डाव आहे. यापुढे देखील अनेक डाव ते टाकू शकतात असं देखील समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील पण राजकारणातील संबंध संपले असं घाटगे यांनी स्पष्ट सांगितलंय.


गेल्या लोकसभा निवडणुकीत माढामध्ये शरद पवारांनी भाजपला खिंडार पाडलं. धैर्यसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणलं. आता समरजित घाटगेंच्या रुपानं पश्चिम महाराष्ट्रातला भाजपचा आणखी एक मोहरा पवारांनी आपल्या पक्षात आणलाय.  1999 पासून लागोपाठ पाचवेळा हसन मुश्रीफ आमदार म्हणून कागलमधून निवडून आलेत. आता या हेवीवेट मंत्र्याला चारी मुंड्या चीत करण्याची पवारांची खेळी यशस्वी होणार का, याची उत्सूकता सगळ्यांना आहे.