Maharashtra Politics​ : पुणे शहरातील शेतकरी आक्रोश मोर्चात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून पायी मोर्चा काढण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे (UBT) संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग शेतकर्‍यांप्रती संवेदनशील होते आणि काही शेतकर्‍यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रातील अमरावतीला गेले होते. मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कोणालाच पर्वा नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतर्फे आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता सभा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शेतकरी आणि कांदा  प्रश्नावरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.


"राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. मी काल अमरावतीत होतो. पहिली बातमी वाचायला मिळाली की दहा दिवसांत आजूबाजूच्या जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. आम्ही सत्तेवर होतो तेव्हा शेतकऱ्याने आत्महत्या केलीय हे कळाल्यावर तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंह आणि आम्ही त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो. ते लोकांप्रती तसेच शेतकर्‍यांप्रती संवेदनशील होते. तेव्हा कळाले की सावकारी पाशामळे त्याने आत्महत्या केली होती. हे समजल्यावर आम्ही दिल्लीला परत गेलो आणि 72 हजार कोटींची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. पण आता शेतकर्‍यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही," असे शरद पवार म्हणाले.


"मी कृषी मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पहिलेच पत्र आलं की अमेरिकेवरून एवढे धान्य आपल्याला देशात आणायचे आहे त्यासाठी सही करावी लागेल, तेव्हा मी म्हणालो की, शेतीप्रधान देश आणि धान्य हे परदेशातून आणायचे. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं फाईलवर सही करा. नाईलाजाने तेव्हा सही करून परदेशातून धान्य आणले गेले. तेव्हाच मी निर्धार केला की, हे चित्र बदलायचे आणि बदललं देखील. शेतीमालाची किंमत कमी केली, खताच्या किमती कमी केल्या, त्याच्या डोक्यावरच ओझं कमी केलं, कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढे धान्य या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या 18 देशांना धान्य निर्यात करण्याचे काम याच बळीराजांनी केले. एवढे कर्तुत्व, एवढी मेहनत, एवढी बांधीलकी ही शेतकऱ्याची आहे," असेही शरद पवार म्हणाले.


"हा कृषीप्रधान देश, पण याना शेतकऱ्यांशी काही पडलेले नाही. आज तीच स्थिती आहे. पण कोणी ढुंकून बघायला तयार नाही. कृषीप्रधान देश आहे पण देशाला कृषीमंत्री नाही. अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न मांडला. हा आक्रोश मोर्चा पुण्यापुरता सीमित राहिलेला नाही, त्याचा आवाज देशात गेलाय. त्यातून देशभरात जागृती घडत आहे. ही जागृती बदल घडवणारी ठरणार आहे. या सामुदायिक जागृतीच्या शक्तिवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्यासंबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्मभूमीपासून आपण केला त्यामुळे यात 100 टक्के यश येईल याची खात्री आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं.