Amol Mitkari To Meet Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 9 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. रविवारी अजित पवारांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी सर्व समर्थक आमदारांची आज देवगिरी बंगल्यावर बैठक बोलवली आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे देखील अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाले आहेत. त्यामुळं मिटकरीदेखील अजित पवारांच्या गटात सामील होणार का?, या प्रश्नांना उधाण आले आहे. त्यावर मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तर, एकीकडे अजित पवार यांच्या गोटात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी या बंगल्यावर आज सर्व समर्थक आमदार एकत्र येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीदेखील अजित पवारांच्या भेटीसाठी हजर झाले आहेत. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, अमोल मिटकरी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त पवारांना भेटायला आलो आहे, असं स्पष्ट करत चर्चा फेटाळल्या आहेत. 


'आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने मी अजितदादांना भेटत असतो. मी जळगावहून त्यांना भेटण्यासाठी आलो आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर, शरद पवार तुमचे राजकीय गुरु नाहीत का? या प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे की, पवार साहेब आज कराडमध्ये ते मुंबईत असते तर आम्ही त्यांच्या दर्शनासाठी गेलो असतो. ते आमच्यासाठी फक्त राजकीय गुरु नव्हे तर पवार साहेबांनी आम्हाला ओळख दिली आहे. त्यामुळं ते आमच्या पक्षाचे भिष्म पितामह आहेत. त्याच्यामुळं ते भारतात वंदनीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे आशीर्वाद घेत असतो,' असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.


'अजित दादांच्या बंगल्यावर सर्वच आमदार त्यांना भेटायला येतात. त्यांना भेटायला कोणालाही बंधन नाही. सर्व पक्ष अजितदादांसोबत आहे. आमच्या पक्षात इतर पक्षासाठी फुट नाही. आमचा पक्ष फुटीर नाही. पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस,' असं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. 


'भाजपचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आहे का. मी संघाचा टोकाचा विरोधक आहे. भाजपचं हिंदुत्व बेगडी आहे. फुले,शाहू आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आम्ही तत्वाशी तडजोड करणार नाहीत. जिथे चुकीची भूमिका असेल तिथे आम्ही बोलणार, असंही मिटकरींनी स्पष्ट केलं आहे. तसंच, अजित पवारांची प्रशासनावर जी पकड आहे त्याची आज महाराष्ट्राला गरज होती त्याचा निर्णय झाला आहे,' असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.