विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या बहिण भावाचं राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर दोघांमधली दरी वाढत गेली. बीडमधली (Beed Politics) कोणतीही निवडणूक असोत. ताई विरुद्ध भाऊ असा सामना ठरलेला असतो. मात्र मुंडे बहिण-भावात दिलजमाई झाल्याची चर्चा आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा दोघे एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताहाची सांगता झाली. तिथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्र येणार?
काही दिवसांपूर्वीच झालेल्या संत भगवानबाबा (Sant Bhagwanbaba) यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि  राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं. यामुळे बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठवरुन दोघांनी घोषणा केली. सत्ता संघर्षावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याची कबुली दोघा बहिण भावाने दिली.


यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे असं म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. आम्ही दोघेही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम, माझा पराक्रम वेगळा त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा पण शक्ती सारखीच असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.


आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचार भलेही वेगळे असले तरी चालेल पण घरातल्या संवादामध्ये तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले.  मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय घेण्याचं कारण नाहीं. असं म्हणत गडाच्या वादावर ती पूर्णविराम दिला.


पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील अंतर कमी झालंय. त्यामुळे यापुढे मुंडे बहीण- भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार नाहीत, पंकजा पाथर्डीतून लढणार अशाही चर्चांना उधाण आलंय. अर्थात दोघांचं मनोमिलन ही नव्या राजकारणाची नांदी ठरु शकते.