`नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..`, जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता
Maharashtra Politics : आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना एक धक्कादायक विधान केलं आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचे विधान अजित पवार यांनी केले आहे.
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा सुरु केला आहे. यावेळी अजित पवार यांनी विविध गावांमध्ये जाऊन विकास कामांची पाहणी देखील केली. मात्र बारामतीच्या निरावागजमध्ये अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाने मोठा वाद निर्माण झाला आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईमधून वाचवल्याचे अजित पवार यांनी भरसभेत म्हटलं आहे. जीवाभावाच्या माणसांमुळे माझी अडचण होते, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी रात्री निरावागजमधील सभेत एक किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना मदत केल्याचे सांगून मोक्कामधील कार्यकर्त्याला वाचवल्याचे अजित पवार म्हणाले. बारामती शहरातील जुन्या भाजी मंडईतील किस्से सांगत असताना अजित पवार यांनी हे विधान केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री मोक्काच्या कारवाईतून वाचवतात का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
"आता बारामतीत एका माणसाचं नाव सांगा, की जो दादागिरी करतो. त्याच्याकडे बघतोच कसं काय दादागिरी करतो ते. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाला विचारा.. नानाचा एक जवळच्या माणसाला मोक्का लागत होता. त्यावेळी वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी सांगितले की, दादा एवढ्या वेळ वाचवा. त्यावेळी एकच वेळ सांगतो परत ऐकणार नाही, असं सांगितलं. कारण अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढे कडक वागतात आणि अशा गोष्टीला कसं पाठीशी घालता. पण तेव्हा माझापण कमीपणा होतो. जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते," असे अजित पवार म्हणाले.
हयगह करू नका, टायरमध्ये घाला - अजित पवार
"बारामती प्रत्येक घटकाला भले तो संख्येने कमी असेल पण तो बारामतीचा नागरिक आहे त्याला सुरक्षित वाटले पाहिजे. त्याच्याकडे वाकड्या नजरेने कुणी बघता कामा नये. मुलींना त्रास देता कामा नये. यासाठी पोलीस प्रशासनाने त्याला वेळीच टायरमध्ये घाला कोणाची हयगह करू नका, असेही अजित पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांची टीका
"दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. 25 हजार कोटीचा इन्कमटॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधाऱ्यांकडून हेदेखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, सालं काय दुर्दैवं आहे... आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेपण आम्ही काढू शकत नाही किंवा ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते, हे सगळं दादा आपल्या तोंडून सांगून गेले. म्हणजे पोलिसांकडून मोक्कासुद्धा गरीबालाच लावतात आणि ज्याचा राजकीय वशिला असतो, त्याला सोडून देतात. इन्कमटॅक्सच्या धाडी कोणावर पडतात, हे मला माहित नाही; पण, 25 हजार कोटीला आयकर माफ होऊ शकतो, हे तर आश्चर्यकारकच आहे. पण असो, दादांच्या शब्दातून येथील कारभार कसा उत्तमरित्या सुरू आहे याची "गॅरंटी" देण्यात आली. दादां वर मी टीका केली नाही त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचे कौतुक केले," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.