Maharashtra Politics : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना जाहीर झाला आहे. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मात्र देशातील विरोधी पक्षांसह महाविकास आघाडीने (MVA) याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींच्या गौरवाला जाऊ नये म्हणून शरद पवार यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ शरद पवारांना भेटणार होते. काँग्रेस,आप,ठाकरे,पवार गटाचे नेते शिष्टमंडळामध्ये उपस्थित राहणार होते. पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबागेतील घरी शिष्टमंडळ भेट घेणार होते. मात्र ही भेट नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम असून त्यांनी या शिष्टमंडळाची भेट नाकारली आहे.


लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी  शरद पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.


गेल्या आठवड्यात शुक्रवारी इंडिया ब्लॉकच्या फ्लोअर लीडर्सच्या बैठकीत, काही सदस्यांनी पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असलेल्या कार्यक्रमात पवार प्रमुख पाहुणे असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रवादीच्या नेत्याशी बोलू शकतात आणि त्यांना कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची विनंती करू शकतात असे म्हटलं जात होतं.


दरम्यान, राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनीही पवार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पवारांच्या निर्णयावर मी वैयक्तिकरित्या नाराज असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमापासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना केले. पवारांनी स्वतः पंतप्रधान मोदींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. टिळक ट्रस्टच्या सदस्यांच्या विनंतीवरून त्यांनी तसे केले. अजित पवार वेगळे होण्यापूर्वी पवारांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिल्याचे वंदना चव्हाण यांनी सांगितले.