`अजिबात चालणार नाही`; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध
Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत महायुतीची जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देखील केली. या चर्चेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईतल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये चर्चा केली होती. ही चर्चा केवळ मनसेला महाआघाडीत घेण्यापुरती मर्यादित नव्हती तर राज ठाकरेंना सोबत घेण्यामागे मोठी रणनीती असल्याचे म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली शिवसेनेचे प्रमुख पद राज ठाकरे यांना देण्याचा प्रस्ताव मनसेला देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. मात्र या निर्णयाला शिवसेना शिंदे गटातल्या आमदार खासदारांनी विरोध केला आहे.
दिल्लीतल्या बैठकीत भाजपने राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत मनसे विलीन करणे आणि राज ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करणार. म्हणजे शिवसेनेची कमान राज ठाकरे यांच्याकडे द्यायची आणि त्यांना शिवसेनेचे पक्ष प्रमुख बनवायचे. मात्र या पर्यायाला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
"मी सध्या सांगोल्यात आहेत. मला अशाप्रकारच्या प्रस्तावाबाबत कुठलीही माहिती नाही. त्यात मी अज्ञानी आहे. परंतु आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेंच राहिले पाहिजे. त्यात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. त्यात काही असेल त्याला आम्ही नकार देऊ. असं अजिबात चालणार नाही असं आम्ही स्पष्ट सांगतो," असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
तर, "असा कोणताही विषय नाही. सध्यातरी माझ्यापर्यंत असा विषय आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपाचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करत आहेत. मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. समविचारी पक्ष असल्यामुळे मनसे सोबत आली पाहिजे, अशी आमचीही भावना आहे," असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व सोपवलं. सुरुवातीला राज ठाकरे यांना शिवसेनेसोबत घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र त्यावेळी राज ठाकरे यांनी तात्काळ संमती देण्यास नकार दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांदरम्यान, पुन्हा एकदा राज ठाकरेंकडे शिवसेनेचे प्रमुख पद दिलं जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.