Srinivas Pawar on Ajit Pawar: राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबियांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चांगली जुंपली आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आता बारामतीमधील संपूर्ण पवार कुटुंब उतरले आहे अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नालायक माणूस असा उल्लेख करत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दादांच्या विरोधात कसा काय आलो याचं आश्चर्य वाटलं असेल. दादांच्या चांगल्या आणि वाईट काळात मी त्यांच्यासोबत होतो. त्यांनी जे निर्णय घेतले त्यात मी साथ दिली. भाऊ म्हणून त्यांनी सांगितले तिथे उडी मारली. कधी काही विचारलं नाही. पण आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझं म्हणणं होतं की आमदारकीला तू आहेत तर खासदारकी साहेबांकडे दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. साहेबांची वय आता 83 झाल्यामुळे या वयात त्यांना सोडणे मला पटले नाही. वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. कारण पुढची 10 वर्षे दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे," असे श्रीनिवास पवार म्हणाले.


"मी काही राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. आपण औषध घेतो त्याची एक्सपायरी डेट असते तशी काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. आता माझी वय 60 आहे मला दाबून जगायचे नाही. जगायची तर ताट मानेने व स्वाभिमानाने जगायचे आहे. केवळ कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे हे बरोबर नाही. मला नाही वाटत त्यांना सुद्धा झोप येत असेल," असेही श्रीनिवास पवार म्हणाले.


भाजपने शरद पवारांना संपवायचा खूप प्रयत्न केला - श्रीनिवास पवार


"साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला, ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता तर मी खूष झालो असतो. भाजपने साहेबांना संपवायचा खूप खूप प्रयत्न केला. घरातला कोणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही हे इतिहासामध्ये देखील आहे. घर एक असेल तर ते संपू शकत नाही. घरातला माणूसच घरच्यांना घाबरत नाही. माझे हे बोलणे रेकॉर्डिंग करत असाल तर मला देणे घेणे नाही. तुम्ही कोणाला पाठवायचे ते पाठवा. मी कुणालाही घाबरत नाही. मी कुणाकडेही लाभार्थी म्हणून जाणार नाही. मी इथून पुढे मनमोकळेपणाने बोलणार आहे. साहेब जर दहा वर्षांपूर्वीचे असते त्यांनी काय केले असते हे तुम्हाला हे ठाऊक आहे. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका. मधली जी आमची पिढी आहे ती जरा लाभार्थी झाली आहे. तरुण पोरं मात्र हा म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचे ते. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का?,वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातली माणसं  आहोत, आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो त्यांचा औषध पाणी करतो," असेही श्रीनिवास पवार म्हणाले.