उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल
Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.
Maharashtra Politics : अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या हटके लुकमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीच्या या फॅशन सेन्समुळे तिच्यावर अनेकदा टीका ही होते. मात्र भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काही महिन्यांपूर्वी उर्फीच्या कपड्यांमुळे तिला फैलावर घेतलं होतं. चित्रा वाघ यांनी थेट उर्फीविरोधात पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. उर्फीनेही महिला आयोगाकडे धाव घेत तक्रार केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकदा उर्फी जावेद चर्चेत आली ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या एका विधानामुळे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना भास्कर जाधव यांनी उर्फीचे नाव घेत भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. दादरमध्ये गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गोळीबाराप्रकरणी सदा सरवणकर यांना पोलिसांकडून क्लीनचीट मिळाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी भाष्य केले आहे. "यापूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांची ईडीने आणि सीबीआयने चौकशी केली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळत गेली. त्यामुळे सदा सरवणकरांना क्लीन चीट मिळाली, यात काही विशेष नाही. ते भाजपाच्या सरकारमधले एक घटक पक्ष आहे. काय झालं उर्फी जावेदचं? ती पण भाजपात गेली काय? तिच्या कपड्यांबद्दल आता कोणीच काही बोलत नाहीये," असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हते. चित्रा वाघ यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला होता. मुंबईच्या रस्त्यावर उर्फी ज्या प्रकारचे कपडे घालते त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, असे चित्रा वाघ यांचे म्हणणे होते. त्याचवेळी उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली होती.
चित्रा वाघ आक्रमक झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिक्रिया दिल्या होता. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी पोस्ट करत भाष्य केलं होते. सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये अमृता फडवणीस, कंगना, केतकी चितळे यांचे फोटो शेअर करत त्यांच्या वेशभूषेवर टीका केली होती. दुसरीकडे काही वेळासाठी उर्फीने ट्विटवरुनही चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. तसेच मी मला जे आवडतं ते परिधान करणार असा इशाराही दिला होता.