राज्यात आज 105 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांसाठी मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...
कोकणातल्या दापोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत
मुंबई : राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतींसाठी आणि 2 जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. (Nagar Panchayat Election Maharashtra 2021) तसेच भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठीही आज मतदान होणार आहे. आज अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कोकणातल्या दापोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे.
तसेच रोहित पवार, रोहित पाटील, यशोमती ठाकूर, भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांधील ओबीसी समाजाचं २७ टक्के आरक्षण रद्द सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय.
स्थगित झालेल्या नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या निवडणुकांसाठीचा कार्यक्रम शुक्रवारी आयोगाने जाहीर केला. त्यानुसार ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे.
त्यानंतर १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. तर उर्वरीत जागांवर आज ठरल्याप्रमाणे मतदान होत आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, म्हसळा, माणगाव, तळा, पाली आणि खालापूर या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 2 जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे तर 79 जागांसाठी 234 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. ओबीसी राखीव 21 जागा वगळून मतदान होत असून 34 हजार 640 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी जिल्हा परिषद , नगरपालिका निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. खासदार सुनील तटकरे , पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे यांची प्रतिष्ठा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.