Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला `यलो अलर्ट`; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain : गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यात पावसानं चांगलीच हजेरी लावलेली असताना काही भाग मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहेत. असं असलं तरीही राज्याचा बराचसा भाग ओलाचिंब झाल्यामुळं आता धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याची बाब दिलासा देऊन जात आहे. कोकण, विदर्भासह मुंबई आणि उपनगरीय भागामध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. उलटपक्षी पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाची उसंत; कोणत्या भागात मुसळधार?
येत्या 24 तासांमध्ये मुंबईत पावसाची उघडीप सुरु राहील. तर, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये काही भागांत पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. असं असलं तरीही लख्ख सूर्यप्रकाश मात्र आजही नशिबी नसल्यामुळं अनेकांचाच हिरमोड होणार आहे.
उर्वरित महाराष्ट्राबाबत सांगावं तर, कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुण्यासह साताऱ्यातही पावसाच्या सरी या भागाला चिंब भिजवणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वसईत पूरस्थिती....
वसई विरार मध्ये मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वसई परिसरातील गावं गेल्या सात दिवसांपासून पाण्यात आहेत. वसईतील चुळणे गावही जलमय झालंय. साचलेल्या पाण्यातून जीवनावश्यक वस्तू आणायला नागरिकांना मोठी कसरत करावी लागतं आहे.
हेसुग्धा वाचा : मुंबईत 'इंडिया'ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी
तिथे पावसाच्या निमित्तानं पासाळी पर्यटनालाही चालना मिळताना दिसत आहे. पण, काही अतिउत्साही नागरिकांचा उत्साह इथेही अडचणी निर्माण करताना दिसत आहे. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर नुकतीच याची प्रचिती आली. जिथं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन गाड्या नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी गाडी नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. पावसामुळं पिकांचे मोठं नुकसान झालं. 24 तासात तब्बल 201 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. शेतीचे बांध फुटून पाणी शिरल्यानं जमिनी खरडून गेलीय. चींचबन शिवरात केळी, सोयाबीन, कापूस पिकं वाहून गेल्याचं पाहायला मिळालं.