Monsoon Updates : आठवड्याचा शेवटही पावसानं; पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार
Maharashtra Monsoon News : शेवटचा लख्ख सूर्यप्रकाश नेमका कधी पाहिला? हाच प्रश्न आता अनेकजण स्वत:ला विचारु लागले आहत. कारण पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना. पाहा हवामान वृत्त.
Maharashtra Rain Updates : गेल्या साधारण आठवड्याभरापासूनच पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगलाच जोर धरला. मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांसह कोकण आणि विदर्भातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मात्र राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अद्यापही पावसाची मर्जी झालेली दिसत नाही. तूर्तास हा पाऊस सध्या ज्या भागांपर्यंत पोहोचला आहे तिथं मात्र सातत्यानं त्याची ये-जा सुरुच आहे. जून महिन्याच्या अखेरीसही पावसाची दमदार हजेरी असेल असं सांगत जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात मुसळधार पाऊस सुरु राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 5 दिवस पावसाची हजेरी राहील यामध्ये काही भागांना पाऊस झोडपून काढणार आहे. तर, काही ठिकाणांवर मात्र पावसाची रिपरिप सुरुच असेल. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे, मुंबईतही पावसाची जोरदार हजेरी असल्यामुळं समुद्रकिनारी भागांमध्ये जाण्यापासून नागरिकांना रोखण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या महितीनुसार शुक्रवारी पुण्यासह रायगड आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिथं अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी शुक्रवारी यलो अलर्ट असून, शनिवार-रविवार- सोमवारी मात्र शहरात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील 48 तासांत विविध दुर्घटनांमध्ये 3 मृत्यू
मुंबईतील कांदिवली येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास अती मुसळधार पावसादरम्यान घरातील बाथरुमचा स्लॅब कोसळल्यामुळं 35 वर्षीय किशन ढुल्ला नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याआधीही भायखळा येथे झाड पडल्यानं एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मागील 48 तासांत मुंबईत पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू ओढावला आहे.
पावसाळी सहलींसाठी जाणाऱ्यांची चांदी...
तळकोकणात पावसाळी सहलींसाठी येणाऱ्यांसाठी हा पाऊस परवणीचा ठरत आहे. कारण, अनेक भागांमध्ये सध्या बरेच धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळं घाटमाथ्यांच्या रस्त्यानं जात असताना नागरिक रस्त्याच्या कडेला वाहनं थांबवून डोंगरावरून खळाखत वाहणाऱ्या या धबधब्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. तिथं कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. ज्यामुळं पहिल्याच दिवशी अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल झाले. हा सिंधुदुर्गातील सर्वात सुरक्षित धबधबा असल्यानं, दरवर्षी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील लाखो पर्यटक इथे येतात.