पाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain News : महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता मात्र काहीशी विश्रांती घेणार असून पुढील काही दिवसांसाठी असंच वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळं रखडलेली कामं आताच करुन घ्या.
Maharashtra Weather News : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच थैमान घालणाऱ्या पावसानं आता अखेरच्या टप्प्यातही धुमाकूळ घातल्यानंतर काहीशी उसंत घेतल्याचं चिन्हं आहे. सतत बरसणाऱ्या वरुणराजानं रविवारीसुद्धा मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विश्रांती घेतली. हे असंच काहीसं चित्र येत्या दिवसांमध्येही पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं लख्ख सूर्यप्रकाशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेकांनाच मोठा दिलासाही मिळणार आहे. थोडक्यात हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर काही अंशी कमी होणार आहे. ज्यामुळं विस्कळीत झालेलं जनजीवन पुन्हा एकदा रुळावर येईल.
पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील घाटमाथा आणि कोकण पट्ट्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर, विदर्भामध्येही पाऊस नमतं घेण्याची चिन्हं आहेत. जुलै महिना गाजवणारा हा पाऊस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये किमान बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणांवरून पूर ओसरून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
उर्वरित राज्यात काय परिस्थिती?
कोकणाच्या काही भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांच मध्यम पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ठाणे, पालघर, पुणे, सातारा भागातही अशीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मराठवाड्यात पुढच्या 24 तासांच पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज आहे.
हेसुद्धा वाचा : अखेरच्या क्षणी ITR भरताय? पाहा ऑनलाईन प्रक्रियेची A to Z माहिती
एकाएकी महाराष्ट्रात कुठून आलेला इतका पाऊस?
जुलै महिन्यात पावसानं जोर धरला आणि अनेकांनाच धडकी भरली. काहींना तर, हा पाऊस आला तरी कुठून असा प्रश्नही अनेकांनीच केला. हवामान खात्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं. मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये जेव्हा खंड येतो तेव्हा हिमालयाच्या पायथ्यासह सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्याभागांमध्ये पाऊस वाढते असं त्यांनी स्पष्ट केलं. तज्ज्ञांच्या मते पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये सरासरी ओलांडली असून, ही आकडेवारी खालीलप्रमाणे....
मुंबई - 71.41 टक्के
शहर- 70.26 टक्के
उपनगर - 68.85 टक्के
दरम्यान, पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळं आजारपणंही दूर जातील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र ही परिस्थिती आटोक्यात येण्याचं चित्र आहे. त्यामुळं पावसा आता तू जरा विश्रांती घेच!, असाच सूर अनेकजण आळवताना दिसत आहेत.