Maharashtra Rain : राज्यातील पावसाची सुट्टी वाढली, मुंबईत उन्हाच्या झळा
Maharashtra Rain : ये रे ये रे पावसा रुसलास का? असं म्हणत आता पावसाला चक्क विनवणी करण्याची वेळ आली आहे. कारण दडी मारून बसलेला हा पाऊस आता फक्त लपंडावाचा खेळ खेळताना दिसत आहे.
Maharashtra Rain : राज्यावर पाऊस रुसला की काय, असेच प्रश्न आता अनेकजण विचारताना दिसत आहेत. कारण, जुलै महिन्यात दडी मारलेल्या या पावसानं अद्यापही परतीची वाट धरलेली नाही. महाराष्ट्रातील बहुतांश भागांध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्या तरीही या श्रावणसरी आहेत असंच अनेकांचं मत. त्यातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळं आता चिंता आणखी वाढली आहे. कारण पावसाची सुट्टी आणखी लांबली आहे.
पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे किमान तीन दिवस तरी राज्यात पाऊस लपंडावाचा खेळ खेळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी म्हणजेच 25 ऑगस्टपासून कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
मान्सूनच्या वाऱ्यांची स्थिती पाहता हे वारे सध्या हिमालयाच्या दिशेला असून, ते या भागावरच घोंगावर आहेत. ज्यामुळं देशाच्या उत्तरेकडे पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. तर, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टाही वायव्येला सरकला आहे. परिणामी सध्यातरी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असलं तरीही समाधानकारक पाऊस मात्र नाहीच. राज्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळं शेतीच्या कामांचा वेग मंदावला आहे. अनेक भागांमध्ये काहीशी शिथिल करण्यात आलेली पाणीकपात पुन्हा एकदा लागू करण्यात आली आहे. तर, इथं मुंबईत उन्हाच्या झळा नागरिकांना हैराण करत आहेत.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळं हाहाकार
आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी पूर्वोत्तर भारतासह सिक्कीममध्ये तूफान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. इथं महाराष्ट्रात पावसानं मोठी विश्रांती घेतलेली असतानाच तिथं हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर काही अंशी कमी झालेला असला तरीही या भागांमध्ये दरडी कोसळण्याचं सत्र सध्या सुरुच आहे. ज्यामुळं वाहतुकीवर याचे थेट परिणाम होत आहेत.