Maharashtra Rain : मुंबईत पावसाची विश्रांती; कोकण, विदर्भात काय परिस्थिती? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : राज्यात पावसानं हाहाकारा माजवल्यानंतर आता हाच पाऊस काही भागांमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. तर, राज्यातील काही भाग मात्र इथंही अपवाद ठरत आहेत.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्यात मात्र उसंत घेतली. असं असलं तरीही कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर काही अंशी कमी झाला असता तरीही या भागात त्यानं विश्रांती मात्र घेतलेली नाही. उलटपक्षी राज्यातील काही भागात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यातील कोकण पट्ट्यावा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीहून काही टक्के कमी असलं तरीही कोकण आणि विदर्भात मात्र पाऊस पूर्णपणे विश्रांती घेणार नाहीये. किंबहुना गुरुवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे. तर, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाध्यावरील भागातही पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इथं मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, काही भागांमध्ये ऊन- सावलीचा खेळ सुरुच राहील असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तिथं मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नाही म्हणता ऑगस्ट महिन्यात पावसाची ये-जा सुरुच असेल हेच आता स्पष्ट होत आहे.
हेसुद्धा वाचा : संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल
धरणांनी गाठली समाधानकारक पाणीपातळी
राज्यात आतापर्यंत झालेला पाऊस पाहता महत्त्वाच्या धरणांची पाणीपातळी समाधानकारकरित्या वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, तुळशी, मोडकसागर या आणि अशा धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर, तिथे ठाण्यासाठी महत्त्वाचं असणारं बारवी धरणही 100 टक्के भरलं असून, त्याचे काही दरवाजे उघडले गेले असून पाण्याचा विसर्गही सुरु करण्यात आला आहे. कोल्हापुरातील राधानगरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळं आता राज्यातील पाण्याची चिंता काही अंशी मिटली असं म्हणणं गैर ठरणार नाही. पण, ही चिंता पूर्णपणे मिटण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज भासेल हे मात्र नाकारता येत नाही.
पुण्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये एकत्रितरित्या 81.99 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे त्यामुळं पाणीसंकट कुठेतरी टळताना दिसत आहे.