संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल

भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे.  त्यांच्याविरोधात आंदोलन होत आहेत. आता मात्र थेट संभाजी भिडेंनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Updated: Aug 2, 2023, 10:48 PM IST
संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल title=

Sambhaji Bhide Controversy :  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत येणार आहेत. संभाजी भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. भिडें विरोधात आंदोलन होत आहेत. मात्र, थेट संभाजी भिडेंनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  माजी राज्यमंत्र्याने ही धमकी दिली आहे. 

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भिडेंना अटक करा नाहीतर त्यांचा खून करणार असं सावजींनी जाहीर केले आहे. सुबोध सावजी यांनी तसं पत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. सावजींच्या या धमकीने एकच खळबळ उडाली आहे. झी २४ तास अशा वक्तव्याचं समर्थन करत नाही, विचारांचा लढा विचारानेच व्हायला हवा असं झी 24 तासचं ठाम मत आहे. 

संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली

संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यक्रम 3 ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये होणार होता. मात्र, प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.. संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात रोष आहे. संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी विधीमंडळात करण्यात आलीय. तर भिडेंविरोधात राज्यभरात आंदोलनही करण्यात आलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे.

उद्धव ठाकरेंनी संभाजी भिडेंचा खरपूस समाचार घेतला

सामान्यांना इतिहासामध्ये गुंतवून ठेवत भविष्य मारायचं हे घातक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी विधानभवनात हजेरी लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी संभाजी भिडेंचा खरपूस समाचार घेतला.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्तविधानावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी 

सभागृहामध्येही विरोधकांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत गोंधळ घातला.. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.  संभाजी भिडेंच्या वादग्रस्तविधानावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. पोलिसांनी भिडेंवर गुन्हा दाखल केलेला असून याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपच्या आवाजाचे नमुनेही तपासले जातील असंही फडणवीसांनी सांगितलंय.

सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार 

सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केलाय. शहरात फौजदार चावडी पोलीस स्टेशन जवळ भिडेंच्या समर्थनार्थ भिडे समर्थक जमले होते. भिडेंच्या समर्थनार्थ तिथे आंदोलन करण्यात येत होतं. शंभर ते दोनशे आंदोलक इथे जमले होते. मात्र आंदोलनकर्ते आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलनानंतर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलकांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज चौक ते फौजदार चावाडी पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलन करण्यात येणार होतं.