पावसाचा कहर : राज्यात 84 जणांचा मृत्यू, रायगडात घर कोसळून एकाचा मृत्यू
Maharashtra Heavy rain : राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण 84 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई / पुणे : Maharashtra Heavy rain : राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण 84 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. (Maharashtra Rains) संततधार पावसामुळे पश्चिम राज्यातील काही भाग आता पूरसदृश स्थितीत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. जेथे पाणी साचले आहे आणि सततच्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एएनआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याचे दिसून आले आहे. रस्ता जवळजवळ ओसंडून वाहणाऱ्या नदीसारखा दिसतो. IMD ने आधीच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे स्पष्ट इशारा आणि अंदाज वर्तविण्यात आला होता.
कोकण भागात पावसाचा इशारा
ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच चक्रीवादळामुळे येत्या चार ते पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. आयएमडीने म्हटले आहे की, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील घाट भागात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. ओडिशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच चक्रीवादळ पसरल्याने पावसाची शक्यता अधिक आहे.
घर कोसळून एकाचा मृत्यू
नवी मुंबईतल्या उरण परिसरात घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. उरण मधील जांभूळपाडा, कातकरी वाडीत अतिवृष्टीमूळे घर कोसळलं या दुर्घटनेत राम कातकरी यांचा मृत्यू झालाय. तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी तहसिलदार आणि त्यांची टीम पोहचून मदतकार्य सुरु आहे.
दोन तरुण पुरात वाहून गेलेत
सुरगाण्याच्या गुलाबी गाव अर्थात भिंतघर येथील दोन तरुण पुरात वाहून गेलेत. हे तिघे तरुण जामनेमाळच्या फरशी पुलावर वाहत्या पाण्यातून मोटार सायकलने जात होते. वाहत्या पाण्यातून वाट काढताना तिघही पडले. या अपघातात तर मागे बसलेला प्रभाकर सुदैवाने बचावला. परंतु आबाजी कडाळी, विजय वाघमारे दोघे वाहून गेलेत. प्रशासनाकडून शोध मोहिम सुरु आहे.
हिंगलोई आणि नांदेडमध्ये पुराचा इशारा
हिंगोली आणि नांदेड भागात मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आल्याने अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील तीन गावांतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.