`...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल`; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणा आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील 20 जानेवारीपासून जालना जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. मनोज जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असं म्हटलं आहे. यावर आता मनोज जरांगेनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातून निघाले आहेत. रविवारी मनोज जरांगे-पाटील यांचा पायी मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात पोहोचला होता. यावेळी बोलताना मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आढळल्या असून हक्काचं आरक्षण द्यावं. बाकीचे प्रयत्न करायला गेल्यास त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत भाष्य केलं होतं.
मनोज जरांगे-पाटील यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी अजूनही थांबावं, ही सरकारची इच्छा आहे. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि भूमिका बजावण्याचा अधिकार आहे असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"अजित पवारांना आरक्षण घेऊन येऊ द्या. त्यांच्या गळ्यातच उडी हाणतो. त्यांना सोडतच नाही. आमच्याकडे यायला त्यांना एसटीचं तिकीटही काढून देतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू द्या. मग मुस्लिम आणि धनगरांना कसं आरक्षण मिळत नाहीत ते बघतो. अडचण सरकार आणि प्रशासनाकडून होत आहे. मुंबईच्या गल्लीत आणि राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर मराठेच असणार आहेत. आमच्यासाठी दरवाजे कसे बंद करतात ते मी बघतो. आम्हाला मुंबईत आमरण उपोषणासाठी मैदानं दिले नाही तर ती सरकारची सर्वात मोठी नाचक्की असेल. आमचं आंदोलन नियोजित असल्याने अयोध्येला जाऊ शकलो नाही. आमच्या आंदोलनातच रामप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करणार आहे," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाचा तिसरा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या दिशेनं रवाना झाला आहे.