Maharashtra Sadan In Kashmir : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कँनल) जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-कशिमर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.  महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कश्या स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.


बडगाम येथे महाराष्ट्र सरकारच्यावतीने बांधण्यात येणा-या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.
अयोध्येत महाराष्ट्र सदन 


महाराष्ट्र सरकारला अयोध्या परिसरात महाराष्ट्र सदनासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातून अयोध्येला जाणा-या भक्तांसाठी या ठिकाणी राहण्याची सोय होणार आहे. शरयू नदी जवळ 2 एकर जागा द्यायला उत्तर प्रदेश सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.