महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी 7 वाजता बंद केले जातात मोबाईल, नेमकं काय घडतं या गावात?
संध्याकाळी नेमकं काय घडतं या गावात, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
रवींद्र कांबळे, झी मराठी, सांगली : तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात मोबाईल (Mobile) आणि इंटरनेटने (Internet) लोकांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. मोबाईलपासून एक दिवसच काय तर एक तासही आपण लांब राहू शकत नाही. दैनंदिन आयुष्यातील अनेक कामं आपण मोबाईलच्या माध्यमातून करत असतो. तरुण पिढीला तर मोबाईलचं व्यसनचं (Mobile Addiction) लागलं आहे. मोबाईलमुळे आपण नकळत कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांपासून दूरावत चाललो आहे. एका रिसर्चमध्ये (Research) मोबाईलवर अनेक तास घालवल्याने आरोग्यावरही त्याचे परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
अशात महाराष्ट्रातल्या (Maharashtra) सांगली (Sangli) जिल्ह्यातीलएका गावात डिजिटल (Digital) प्रभावापासून वाचवण्यासाठी एक अनोखा प्रयोग राबवण्यात आला आहे. या गावात संध्याकाळी सात वाजले की लोकं आपला मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅजेट्स बंद करतात. विशेष म्हणजे यासाठी मंदिरातून सायरन वाजवला जातो.
सांगली जिल्ह्यातील गावातील अनोखा प्रयोग
कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचं मोहित्यांचे वडगाव ताकारी योजनेमुळे बागायती झालं आहे. हातात उसाचा पैसा आल्याने मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळली. याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शाळेच्या पटसंख्येवर झाला. तर कोरोना काळात मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. याचा विचार करण्यासाठी सरपंच विजय मोहिते यांनी 14 ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. यावेळी महिलांनी मुलांच्या अभ्यासाचा विषय मांडला. मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या अभ्यासासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला.
या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे. रोज सायंकाळी सात वाजता भोंगाही वाजतो. सर्व मुलं ही घरी पोहचतात आणि अभ्यास करतात. त्यांचे पालक सुद्धा आपल्या पाल्यांचे अभ्यास करून घेतात. त्याच बरोबर महिला ह्या स्वयंपाक आणि विविध पुस्तक वाचन करतात. या अनोख्या प्रयोगामुळे मोबाईलमूळे कुटूंबातील हरवलेला संवाद पुन्हा सुरु झाला आहे.
क्रांतीकारकांचं गाव
मोहित्यांचे वडगाव या गावात 15 क्रांतीकारक व्होवून गेले आहेत. स्वातंत्र्य संग्रामात या गावातील लोकांनी मोठी कामगिरी केली आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मोहित्यांचे वडगाव मध्ये क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. या गावात 99 टक्के लोकांचं आडनाव मोहिते असून त्यामुळे फार पूर्वीपासून मोहित्यांचे वडगाव हे नाव पडलं आहे. मोहित्यांचे वडगाव या गावामध्ये प्राथमिक शाळेत शिकणारी 130 तर, माध्यमिक शाळेत शिकणारी 450 मुले आहेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अभ्यास करावा यासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला. या वेळेत मुले घराबाहेर दिसणार नाहीत याची जबाबदारी जशी पालकांवर आहे, तशीच गावातील अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे.