शाळेची घंटा वाजण्याआधी कोरोनाची धोक्याची घंटा, शेजारी राज्यांना ठेच, महाराष्ट्र शहाणा होणार?
सावधान ! लहान मुलांमध्ये कोरोनाचा फैलाव, जिकडे शाळा सुरू झाल्या, तिकडे कोरोना वाढला
योगेश खरे झी मीडिया मुंबई: देशातल्या विविध राज्यांमधील लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्यानंतर मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे घाईगडबडीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणारा महाराष्ट्र यातून काही धडा घेणार का? असा प्रश्न पडत आहे याचं कारणही तसंच आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होणार की नाही यावर गोंधळ सुरू आहे.
महाराष्ट्राशेजारच्या कर्नाटक राज्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या 10 दिवसांत कोरोनाबाधित मुलांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. कर्नाटकात अजून शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्याआधीच लहान मुलांमध्ये कोरोना वाढत असल्याचं दिसत आहे.
1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत तब्बल 543 मुलं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. ही सगळी मुलं 19 वर्षांखालील आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं आढळलीत. हिमाचल प्रदेशात 60 मुलं कोरोनानं बाधित आहेत. पंजाबमध्ये 33 शाळकरी मुलांना कोरोना संसर्ग झालाय. छत्तीसगढमध्ये 11, तर हरयाणात 6 मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला होता. मात्र टास्क फोर्सच्या विरोधानंतर त्याला स्थगिती देण्यात आली. इतर राज्यांतील लहान मुलांमधील कोरोनाचा संसर्ग पाहता, शाळा सुरू न करण्याचा निर्णय योग्यच होता असं यावरून स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंट रुग्णांची संख्या देखील वाढत चाललीय. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटनं ५ जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. लहान मुलांना कोरोनापासून वाचवायचं असेल, तर महाराष्ट्रानं आतापासूनच सावध पावलं उचलायला हवीत.